Wednesday, December 9, 2009

विठ्ठल

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥

-------------------------

आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदचि अंग आनंदचे ॥१॥

काय सांगो झालें कांहीचिया बाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिता मुखा आला ॥४॥

--------------------------

अजि सोनियाचा दिनु ।
वर्षे अमृताचा घनु ॥१॥

हरि पाहिला रे हरि पाहिला रे ।
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥

दृढ विटे मन मुळी ।
विराजित वनमाळी ॥३॥

बरवा संतसमागमु ।
प्रगटला आत्मारामु ॥४॥

कृपासिंधु करुणाकरू ।
बाप रखमादेविवरू ॥५॥


जेव्हा जेव्हा हे अभंग मी ऐकतो तेव्हा तेव्हा मनात एक अनामिक भावना येते. ते काय हे मला ठरवता येत नाही. मनाला एक प्रकारची हुरहुर लागते. यात त्यातल्या संगीताचा वाटा मोठा. पण ते शब्द...पहिल्या अभंगात नामदेवांना जळी स्थळी काष्ठी जसं म्हणतात, तसं त्यांना विठ्ठल दिसतो. त्यांच्यासाठी सर्वकाही म्हणजे विठ्ठल. ह्यातला विठ्ठल मला काहीसा प्रतीकात्मक वाटतो. विठ्ठल म्हणजे तुम्ही ज्यासाठी जगताय ते. असं काही की ज्याच्यासाठी तुम्ही सर्व काही विसरु शकता ते. तुमच्यासाठी सर्व काही तेच होतं. नामदेवांसाठी ते तीर्थ होतं, क्षेत्र होतं, बंधु , गुरू पिता सर्व काही विठ्ठल. असा विठ्ठल नामदेवांना सापडला. तो काय़ हे मला माहित नाही. (पण तो विठ्ठल एखादी मुर्ति खचितच नसणार.) असा विठ्ठल खरच असतो का? मला तो सापडेल?

तुकारामांच्या भाषेत ह्याच अवस्थेला ते 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अस म्हणतात. आणि शेवटचा अभंग म्हणजे तर सगळ्याचा कळस...लता मंगेशकरांचे भैरवीचे स्वर ऐकताना खरच अमृताचा घनु वर्षतोय अस वाटतं.... हे तीनही अभंग एकाच अवस्थेचे वर्णन करतात. ती अवस्था काय ते नाही मला सांगता येणार.

No comments:

Post a Comment